Breaking News -: वाल्मिक कराड पोलिसांना शरण
वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुनच ही हत्या झाल्याचा आरोप विरोधकांनी केला, त्यानंतर बीडमधील कराडच्या दहशतीचे, अवैध धंद्यांचे, गुन्हेगारीचे असंख्य किस्से समोर येऊ लागले.

पुणे -: बीडमधील मस्सजोगचे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांच्या रडारवर असलेले आणि बीड येथे पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेले वाल्मिक कराडबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या 15 दिवसांपासून गुंगारा देत असलेल्या वाल्मिक कराडला अखेर पोलिसांना शरण गेला आहे.
9 डिसेंबर 2024 रोजी मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात तपास सुरु असतानाच वाल्मिक कराड हे नाव समोर आले. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुनच ही हत्या झाल्याचा आरोप विरोधकांनी केला, त्यानंतर बीडमधील कराडच्या दहशतीचे, अवैध धंद्यांचे, गुन्हेगारीचे असंख्य किस्से समोर येऊ लागले.
राज्याच्या हिवाळी अधिवेशनात संतोष देशमुख हे प्रकरण प्रचंड गाजले, ज्यामध्ये या हत्याकांडाचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे सांगत विरोधकांनी रान पेटवले. राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या आश्रयानेच वाल्मिक कराडची ही गुंडगिरी सुरु असल्याचे आरोप करत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली.
याचदरम्यान बीड येथे पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराडवर गुन्हा नोंद करण्यात आला. तेव्हापासून वाल्मिक कराड यांचा शोध सुरु होता. गेल्या दोन दिवसांपासून सीआयडीने वाल्मिक कराडच्या कुटुंबियांचीही चौकशी सुरु केली होती, तसेच त्याची बँक खाती गोठवून चांगलीच कोंडी केली होती.
सीआयडीने फास आवळल्याने वाल्मिक कराड कोणत्याही क्षणी क्षरण येईल, असं बोलले जात होते. अखेर त्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून या प्रकरणात आता पुढे काय कारवाई होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.