सहकारी संस्थांना प्रस्ताव सादर करण्यास ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ
सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी संस्थांना सहकार पुरस्कार
पुणे- : सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी संस्थांना सहकार पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून संस्थांनी ३१ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना सन २०२३-२४ चा पुरस्कार देवून त्यांचा उचित गौरव करण्यासाठी शासनाने सहकार पुरस्कार देण्याचे ठरविले आहे. यासाठी यापूर्वी १८ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्यास कळविण्यात आले होते. तथापि, सन २०२५ या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये अधिकाधिक सहकारी संस्थांना पुरस्कार मिळण्याकरिता प्रस्ताव सादर करता यावेत यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील इच्छुक सहकारी संस्थांनी सविस्तर प्रस्ताव संबंधित तालुक्याच्या सहायक निबंधक, सहकारी संस्था किंवा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात सादर करावेत.
सहकारी संस्थांनी पुरस्काराच्या अटी, निकष आदी अधिक माहितीसाठी https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच तालुक्याचे सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक अथवा विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्ह्याचे अपर निबंधक (पतसंस्था) सहकारी संस्था, श्रीकृष्ण वाडेकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.