अजितदादा पुन्हा शरद पवारांचा पक्ष फोडणार?:राष्ट्रवादीच्या महिला नेत्यावर टाकली जबाबदारी ?
पवारांच्या आमदार, खासदारांवर नजर

मुंबई-: विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागा जिंकल्या. तर शरद पवारांच्या पक्षाला अवघ्या 10 जागांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर आता अजित पवारांनी शरद पवारांच्या गोटातील आणखी काही आमदार व खासदारांना आपल्या पारड्यात ओढण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. यासाठी त्यांनी मोठी रणनीती आखली आहे.
अजित पवारांची शरद पवारांच्या खासदारांवर नजर
NBT च्या वृत्तानुसार, अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांचे नेते फोडण्याची जबाबदारी आपल्या पक्षाच्या एका महिला नेत्यावर टाकली आहे. त्यानुसार या महिला नेत्याने आपले फासे टाकण्यास सुरुवातही केली आहे. अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्याचा संबंधही या प्रकरणाशी जोडला जात आहे. असे झाले तर केंद्रातील एनडीए सरकारला आणखी बळकटी प्राप्त होईल. कारण, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा सध्या केवळ 1 खासदार आहे. ते सुनील तटकरे आहेत. याऊलट शरद पवारांकडे 8 खासदार आहेत. यात त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे.
अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचे काही खासदार अजित पवार गटात जाण्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे अजित पवार सहाव्यांदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असताना ही चर्चा सुरु झाली आहे. अजित पवारांच्या खासदारांची संख्या वाढल्यानंतर केंद्रात प्रफुल्ल पटेल यांना कॅबिनेट मंत्री केले जाईल अशीही चर्चा आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे शरद पवार गटाचे भिवंडीचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी सोमवारीच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली होती. म्हात्रे यांनी आपण आपल्या खासगी कारणांसाठी फडणवीसांची भेट घेतल्याचे स्पष्ट केले होते. पण या भेटीमागे अनेक कारणे दडल्याचा दावा केला जात आहे.
सध्या एनडीएकडे 293 खासदारांचे संख्याबळ
सद्यस्थितीत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला 293 खासदारांचा पाठिंबा आहे. महाराष्ट्र व झारखंडमध्ये लोकसभेच्या 2 जागांसाठी नुकतीच पोटनिवडणूक झाली. त्यात नांदेड व वायनाड लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता. या दोन्ही जागा काँग्रेसने आपल्या खिशात टाकून आपला 99 चा स्कोअर कायम राखला आहे. एनडीएमध्ये सध्या भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्याचे स्वतःचे 240 खासदार आहेत. तर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे तेदेपा व जदयु आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांच्याकडे 7 खासदार आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांपैकी काँग्रेसने सर्वाधिक 13, उद्धव ठाकरे गटाने 9 व शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 8 जागा जिंकल्या आहेत. या पक्षांच्या महाविकास आघाडीला सांगलीतील एका अपक्ष खासदाराने पाठिंबा दिला आहे