पुणे तिथे काय उणे दौंडच्या पठ्ठानं उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज भरला…!
उमेश म्हेत्रे याने याआधी माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या १४७ कोपरी पाचपाखडी मतदार संघात देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता

दिल्ली – : उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पुढील महिन्यात होणार आहे. जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक होत आहे. एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. तर, इंडिया आघाडीने माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, या निवडणुकीत आता पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात तरुणाने उडी घेतली आहे.
दौंड तालुक्यातील सहजपूर गावचा तरूण उमेश म्हेत्रे याने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेशने दिल्ली गाठली आणि उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्यसभेच्या दालनात निवडणूक निर्णय अधिकारी पी.सी मोदी आणि गिरीमा जैन यांच्याकडे उमेशने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
दौंडमधील एका साध्या तरुणाने उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार अर्ज भरल्याने सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे उमेश म्हेत्रे याने याआधी दौंड विधान सभा मतदार संघात देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी देखील अर्ज दाखल केला होता. मात्र, उमेदवारी अर्जावर अनुमोदक म्हणून दहा आमदारांच्या सह्या आवश्यक असल्याने त्याचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता.
राधाकृष्णन विरुद्ध रेड्डीच लढत
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सीपी राधाकृष्णन आणि ही सुदर्शन रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या उमेदवारांमध्येच लढत होण्याची शक्यता आहे. उमेश म्हात्रे याने उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी त्याचा अर्ज हा तांत्रिक कारणांमुळे बाद होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.