मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतरच रिंग रोड भूमिपूजनाच्या मुहूर्ताची शक्यता

पुणे – : वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या पुण्याच्या वर्तुळाकार मार्गासाठी (रिंग रोड) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) पुणे, पिंपरी-चिंचवडभोवती विकसित केल्या जाणाऱ्या सुमारे ४२ हजार कोटी रुपयांच्या रिंग रोडसाठी पूर्व आणि पश्चिम भागांतील सुमारे ९० टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे; तरीही केवळ भूमिपूजनाअभावी रिंग रोडच्या प्रत्यक्ष कामाला मुहूर्त लागत नसल्याचे समोर आले आहे.

मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतरच भूमीपूजन शक्य असल्याने नऊ वर्षांनंतर या प्रकल्पाच्या कामाला खऱ्या अर्थाने गती प्राप्त होणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडभोवती उभारल्या जाणाऱ्या रिंग रोडमुळे पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरून सातारा, नगर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूरकडे जाण्यासाठी लागणारे अंतर कमी होणार आहे. सुमारे १६९ किलोमीटर लांबीचा आणि ११० मीटर रुंदीचा हा रिंग रोड आहे. विधानसभेची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४२ हजार ७११ कोटी रुपयांच्या सुधारीत प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. पूर्व भागात सात आणि पश्चिम भागांत पाच टप्पे आहेत.
रिंग रोडच्या नऊ पॅकेजच्या कामांसाठी पाच कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी नवयुग कंपनीला तीन आणि पीएनसी कंपनीला एक अशा चार पॅकेजसाठी वर्क ऑर्डर (अपॉइंटमेंट डेट) दिली आहे. मेघा कंपनीला तीन पॅकेजेस, जीआर आणि रोडवेज या कंपन्यांना प्रत्येकी एक अशा पाच पॅकेजसाठी ‘वर्क ऑर्डर’ देण्याची प्रक्रिया राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू आहे.
भूमिपूजनानंतर पूर्व आणि पश्चिम भागांतील नऊ टप्प्यांचे काम एकाच वेळी सुरू होणार आहे. वाडेबोल्हाई, खडकवासला, सिंहगड, मुळशी, उर्से, चाकण, हिंजवडी, सोरतापवाडी या सर्व बाजूंनी रिंग रोडचे काम एकत्रितपणे एकाच वेळी सुरू केले जाणार आहे. भूमिपूजनानंतर एका महिन्यात काम तातडीने सुरू होईल, असे रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले