मविआच्या सर्व नेत्यांची शपथविधीकडे पाठ; पण पवारांचा आमदार अचानक दिसला आझाद मैदानात
मुंबई: महायुतीने विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवत मोठा विजय प्राप्त केला. त्यात भाजपने १३२ जागा जिंकत हे दाखवून दिलं की राज्यात तोच मोठा भाऊ आहे. त्यानंतर आज महायुतीचा भव्य असा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
या शपथविधी सोहळ्याला राजशिष्टाचार विभागाकडून राज्यातली सर्व महत्त्वाच्या व्यक्तींनी निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. यामध्ये राज्यातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांचा समावेश होता. तसेच, बडे राजकीय नेते, खेळाडू, उद्योगपती, सिनेस्टार यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलं होतं.
परंतु, महाविकास आघाडीने या शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवल्याचं दिसून आलं. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या प्रमुखांनी या सोहळ्याना उपस्थिती दर्शवली नाही. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे यापैकी कोणीही या शपथविधीला हजेरी लावली नाही. देवेंद्र फडणवीसांनी स्वत: शरद पवारांना फोन करत आमंत्रण दिल्याची माहिती आहे. मात्र, ते दिल्लीत असल्याने ते येऊ शकले नाहीत. पण, शरद पवारांच्या एका आमदाराने या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
शरद पवार गटाचे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील हे देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याला दिसले आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या.
मात्र, महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवारांचा आमदार आझाद मैदानावर दिसल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.