वाळुचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले; ड्रोनची असणार नजर
वाळूचा बेकायदा उपसा रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘ड्रोन’द्वारे आता नदी नाल्यांवर ‘वॉच’ ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वाळू चोरीला चाप बसणार

पुणे : पुणे जिल्ह्यात नदी नाल्यांमधून वाळूची उपसा केली जात आहे. बोटींमधून रात्रीच्यावेळी वाळूचा बेकायदा उपसा तसेच तस्करी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘ड्रोन’द्वारे आता नदी नाल्यांवर ‘वॉच’ ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वाळू माफियांच्या वाळू चोरीला चाप बसणार आहे. जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड तसेच आंबेगाव, जुन्नर,हवेली भागात या ड्रोनचा वापर केला जाणार आहे.
पुणे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये बेकायदा वाळू उपसा राजरोजपणे सुरू आहे. राज्य सरकारने सर्वसामान्यांना वाळू माफक दरात मिळावी यासाठी धोरण आखले आहे. त्यानुसार प्रति ब्रास सहाशे रुपये दराने वाळूची विक्री केली जात आहे. त्यासाठी जिल्ह्यात सुमारे २६ ठिकाणी ठेके देण्यात आले आहेत. त्यानुसार वाळूची विक्री सध्या केली जात आहे. तरीही वाळूचा बेकायदा उपसा सुरू असून, त्याद्वारे वाळूची तस्करी केली जात आहे. त्यासाठी ही चोरी पकडण्यासाठी तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ड्रोनचा वापर सुरू केला आहे.
दिवसा किंवा रात्री नदीतून बोटीद्वारे वाळूचा उपसा केला जातो. मात्र, उपसा केलेल्या वाळूचा साठा नदीकाठच्या झाडा झुडपांमध्ये लपविला जातो किंवा शेजारील शेतीमध्ये ठेवला जातो. तसेच ट्रकही तेथेच लपविले जातात. त्या जागेपर्यंत महसूल विभागातील तहसिलदारासंह अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोहोचता येत नाही. त्यामुळे वाळू चोरी रोखणे शक्य होत नाही. त्याकरिता जिल्हा प्रशासनाने ड्रोन घेतले असून, त्याद्वारे आता नदी नाल्यांवर वॉच ठेवला जाणार आहे.