नाराजांना थोपविण्यासाठी शिवसेनेत फिरती मंत्रीपदे;
आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी अडीच वर्षांच्या मंत्रीपदाचा तोडगा

मुंबई (सिटीझन न्यूज नेटवर्क ) -: शिवसेनेतील आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी आणि त्यांना थोपवून ठेवण्यासाठी शिवसेनेतील बहुसंख्य आमदारांना मंत्रिपदाचे वेध लागले असले, तरी पक्षाच्या वाट्याला आठ ते दहापेक्षा अधिक मंत्रीपदे येण्याची शक्यता असल्याने अडीच-अडीच वर्षांची फिरती मंत्रीपदे देण्याचा तोडगा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे .
फडणवीस सरकारमध्ये किती मंत्रीपदे वाट्याला येणार हेदेखील अद्याप निश्चित झालेले नाही. शिंदे गटातील सर्वच माजी मंत्री पुन्हा आस लावून बसले आहेत. गेल्या वेळी संधी हुकलेले ज्येष्ठ नेतेही आशेवर आहेत. आमदारांच्या महत्त्वाकांक्षांमुळे शिंदे यांची डोकेदुखी वाढली असून त्यांचे समाधान करताना नाकीनऊ येत आहेत. मागच्या सरकारमधील मंत्र्यांना दूर ठेवून नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, अशी मागणी गोगावले यांनी उघडपणे केली असताना अन्य आमदारही दबक्या आवाजात चर्चा करीत आहेत.
प्रताप सरनाईक, संजय शिरसाट यांनाही मंत्री व्हायचे आहे. नव्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात सत्ताधारी शिवसेनेच्या आमदारांमध्ये मंत्रीपदाचीच अधिक चर्चा होती. शिंदे यांची भेट घेऊन अनेकांनी इच्छाही व्यक्त केल्याचे समजते.
मागच्या सरकारमधील मंत्र्यांची नाराजी आणि इच्छुकांची महत्त्वाकांक्षा या कात्रीत शिंदे अडकले आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी अडीच वर्षांच्या मंत्रीपदाचा तोडगा काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पहिल्यांदा संधी मिळालेल्यांपैकी काही मंत्र्यांना अडीच वर्षांनंतर पदमुक्त केले जाईल व नव्या आमदारांना संधी दिली जाईल. अर्थात, शिंदे यांचा हा तोडगा आमदारांच्या कितपत पचनी पडेल याबाबत साशंकता आहे.