थेऊरमध्ये वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशीवर गुन्हा दाखल
लोणी काळभोर -: थेऊर परिसरात बेकायदा वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकावर लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हारूल पंचानन बिस्वास (वय ५३, रा. काकडे बिल्डिंग, थेऊर, हवेली, मूळ रा. चंचारी, ता. कालिया, जि. नराईल, बांगलादेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बांगलादेशीचे नाव आहे. याबाबत दरोडाविरोधी पथकाचे अमोल विठ्ठल पवार यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हारूलचा जन्म बांगलादेशमध्ये झालेला आहे.१९७२ पासून तो बांगलादेशाचा नागरिक आहे. त्याच्याकडे भारतीय नागरिक असल्याबाबत कोणताही पुरावा नसताना तो घुसखोरी करून भारतात आला. सुरवातीला तो पश्चिम बंगाल, नंतर देशात विविध ठिकाणी राहिला. सध्या तो थेऊर येथे राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. तो बांगलादेशाचा नागरिक असतानाही त्याने भारतातील बनावट जन्मप्रमाणपत्र तयार केले, तसेच भारतातील आधारकार्ड , पॅनकार्ड, निवडणूक आयोगाचे कार्ड, पासपोर्ट, रेशनकार्ड तयार करून तो थेऊर येथे वास्तव्य करताना आढळून आला.