‘या’ महत्वाच्या प्रोजेक्टमुळे होणार खडकवासला धरणाच्या २.१८ टीएमसी पाण्याची बचत
नवीन मुठा उजवा कालव्याच्या किलोमीटर १ ते ३४ मधील लांबीसाठी पर्यायी खडकवासला ते फुरसुंगीपर्यंत बोगदा प्रकल्प प्रस्तावित

पुणे: खडकवासला प्रकल्पातील खडकवासला धरणापासून फुरसुंगीपर्यंत करण्यात येणार्या बोगद्याचे काम एप्रिल महिन्यापासून सुरू होणार आहे. सध्या या बोगद्याचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली पर्यावरण मान्यता घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्याचबरोबर बांधकाम आराखडा स्थाननिश्चितीकरण करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा याचे कामकाज सुरू असून, ही सर्व कामे खासगी ठेकेदारांच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.
खडकवासला प्रकल्पाच्या नवीन मुठा उजवा कालव्याच्या फुरसुंगी बोगदा प्रकल्पाला या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पासाठी दोन हजार १९० कोटी ४७ लाख रुपयांची तरतूद केली आहे. या बोगद्यामुळे पुणे परिसरास सिंचन आणि पिण्यासाठी अधिकचे पाणी उपलब्ध होणार आहे. खडकवासला प्रकल्पाच्या नवीन मुठा उजवा कालव्याचा किलोमीटर १ ते ३४ लांबीचा भाग पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतून जातो.
पुणे शहराची होणारी वाढ, झोपडपट्टी, अतिक्रमणे व पर्यायाने होणारे जलप्रदूषण, जलनाश यामुळे कालव्याची हानी झाली आहे. त्यामुळे कालव्याच्या वाहनक्षमतेत झालेली घट टाळण्यासाठी नवीन मुठा उजवा कालव्याच्या किलोमीटर १ ते ३४ मधील लांबीसाठी पर्यायी खडकवासला ते फुरसुंगीपर्यंत बोगदा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे २.१८ टीएमसी पाण्याची बचत होणार आहे.
सिंचनासाठी, तसेच बिगर सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे सिंचनापासून वंचित राहणारे तीन हजार ४७१ हेक्टर इतके क्षेत्र पुनर्स्थापित होणार आहे.
सुमारे ३४ किलोमीटरचा हा भूमिगत बोगदा आहे.पर्यावरण मान्यतेसाठी हा प्रस्ताव रवाना झाला आहे. यासाठी काही भागांत भूसंपादनाचे काम अजूनही सुरू आहे. यासाठी बांधकाम आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. बोगद्यासाठी सुमारे दोन हजार कोटींचा खर्च येणार आहे.
प्रकल्पासाठी तरतूद –
२ हजार १९० कोटी
पाण्याची बचत होणार – २.१८ टीएमसी
क्षेत्र सिंचनाखाली येणार – ३४७१ हेक्टर
पुणे पालिकेचे ‘पीएमआरडीए’ला पत्र
शहराला खडकवासला धरणसाखळी आणि भामा आसखेड प्रकल्पातून महापालिकेला २०३२ पर्यंत १६.३६ टीएमसी पाणीसाठा मंजूर आहे.शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सद्य:स्थितीत २१ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पालिकेच्या सुधारित हद्दीजवळील ५ कि.मी.च्या अंतरातील ५१ गावांना पालिकेस पाणी देणे शक्य नसल्याचे पत्र महापालिका प्रशासनाकडून पीएमआरडीएला देण्यात आले आहे.