
पुणे – शेजाऱ्यांबरोबर झालेल्या जुन्या वादातून ही हत्या झाल्याचं तसेच सतीश वाघ यांच्या हत्येसाठी पाच लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, “या हत्या प्रकरणात आतापर्यंत पोलीस व क्राईम ब्रँचने चार आरोपींना अटक केली आहे. मृत व्यक्तीच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच वैयक्तिक वादातून त्यांना मारण्याची सुपारी दिली होती. सुपारी देणाऱ्यासही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर चालू आहे. क्राईम ब्रँच व स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. घटना घडल्यापासून आतापर्यंत वेगवेगळी पथकं काम करत होती .
पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी व पुरावे गोळा करण्यासाठी आतापर्यंत ४५० ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. त्याचदरम्यान त्यांनी एक गाडी शोधून काढली. सतीश वाघ यांचं अपहरण करण्यासाठी व हत्या केल्यानंतर पलायन करण्यासाठी आरोपींनी वापरलेल्या कारपर्यंत आम्ही पोहोचलो. त्या कारच्या मदतीनेच पोलीस आरोपीपर्यंत पोहोचू शकले आणि त्यांनी आरोपींच्या मुस्क्या आवळल्या आहेत. झोनल पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आता क्राईम ब्रँचकडे हस्तांतरित केला आहे. आम्ही आरोपींविरोधात ठोस पुरावे गोळा करत आहोत. या प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होईल यासाठी पोलीस मेहनतीने काम करत आहेत.
या हत्या प्रकरणात पोलिसांनी काल संध्याकाळपर्यंत दोन आरोपींना अटक केली होती. त्यानंतर आज दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून आतापर्यंत चार जण अटकेत आहेत. सतीश वाघ यांचा काही दिवसांपूर्वी शेजारी राहणाऱ्या व्यक्तीबरोबर वाद झाला होता. त्याच वादातून त्यांच्या शेजाऱ्याने वाघ यांची हत्या करण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यातून हे अपहरण व हत्या झाली आहे. पोलीस आरोपींची चौकशी करत आहेत.