crimemaharashtrapune

ज्याला पुणे टरकतं, त्यालाच कानफाडलं, कुख्यात गुंड निलेश घायवळला मारणारा तरुण कोण?

“धाराशिव: शुक्रवारी रात्री उशिरा पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर एका तरुणाने हल्ला केला आहे. निलेश घायवळ गावातील जत्रेत आपल्या काही साथीदारांसोबत आला होता. येथील कुस्तीच्या फडाला भेट देत असताना तरुणाने निलेश घायवळला मारहाण केली आहे. मारहाण केल्यानंतर संबंधित तरुण घटनास्थळावरून पसार झाला होता. त्यामुळे हा हल्ला कुणी केला, हे स्पष्ट होत नव्हता. मात्र आता कुख्यात गुंडाला भिडणाऱ्या तरुणाचं नाव समोर आलं आहे.

सागर मोहोळकर असं हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. तो अहिल्यानगर जिल्ह्यातील नानज गावचा रहिवासी आहे. तो पेशाने पहिलवान असून शुक्रवारी रात्री तो धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील आंदरुड गावच्या जत्रेला उपस्थित होता. गावात जत्रेनिमित्त कुस्तीचा फड भरला होता. सागर हाही इथं आला होता. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळही कुस्ती पाहायला आला होता. यावेळी तो आयोजकांसोबत पहिलवानांना भेटण्यासाठी जात असताना अचानक सागरने घायवळवर हल्ला केला. गर्दीतून वाट काढत सागरने निलेश घायवळला कानशिलात लगावल्या आहेत.

हा हल्ला होताच घायवळसोबत असलेल्या त्याच्या साथीदारांनी प्रतिहल्ला करत सागर मोहोळकरला मारहाण केली. या हल्ल्यानंतर सागर घटनास्थळावरून पसार झाला. निलेश घायवळ देखील तिथून निघून गेला. या प्रकरणी आता पोलिसांनी स्वत:हून गुन्हा दाखल केला आहे. वाशी पोलिसांनी पोलिसासमोरच हाणामारी करून गोंधळ घालण्याचा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घायवळवर हल्ला करणारा सागर सध्या वाशी पोलीस ठाण्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्याने निलेश घायवळवर नेमका कोणत्या कारणातून हल्ला केला, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!