कृषी आयु्क्तालयातील उपसंचालक एसीबीच्या जाळ्यात; अडीच लाख रुपयांची लाच घेताना पकडले
कृषी आयुक्तालयातील फलोत्पादन विभागातील उपसंचालक संजय गुंजाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले

पुणे : कृषी आयुक्तालयातील फलोत्पादन विभागातील उपसंचालक संजय गुंजाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले आहेत. गैरव्यवहार प्रकरणात निलंबित केलेल्या कर्मचाऱ्याकडून तीन लाख रुपयांची लाच मागितल्यामुळे त्यांना पकडण्यात आले आहे. संगमवाडी परिसरात शुक्रवारी रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबित कर्मचाऱ्याकडून अडीच लाख रुपयांची लाच घेताना गुंजाळ यांना ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी कृषी आयुक्तालयातील फलोत्पादन विभागातील उपसंचालक, प्रभारी सहसंचालक संजय बहादू गुंजाळ यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये येरवडा पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कृषी आयुक्तालयातील निलंबित कर्मचाऱ्याने तक्रार दिली आहे.
तक्रारदार २०१९-२०२० मध्ये जळगाव जामोद बुलढाणा येथे कनिष्ठ लिपिक होते. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत गैरव्यवहार, तसेच कसुरी केल्याचा ठपका ठेवून अमरावतीतील कृषी सहसंचालकांनी त्यांना सेवेतून निलंबित केले होते. याप्रकरणाची चौकशी सुरू होती. निलंबन कालावधीत मदत करणे, तसेच तक्रारदारावर घेतलेल्या आक्षेपांविरुद्ध मदत करण्यासाठी गुंजाळ यांनी त्यांच्याकडे तीन लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने तडजोडीत अडीच लाख रुपयांची लाच देण्याचे मान्य केले. तर पुणे एसीबीकडे तक्रार दिली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली.
तक्रारीत तथ्य आढळल्याने सापळा लावला. शुक्रवारी रात्री तक्रारदाराला अडीच लाख रुपये घेऊन संगमवाडी येथील खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या आराम बस थांब्यावर बोलाविण्यात आले. तक्रारदाराकडून लाच घेताना गुंजाळ यांना पकडण्यात आले. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनखाली ही कारवाई करण्यात आली. रात्री उशीरा त्यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर अधिक तपास करत आहेत.